बेंगळूरु – गॅंगस्टर रवि पुजारीला सेनेगलमधून आज पहाटे भारतात आणण्यात आले. खंडणी, हत्या आणि इतर अनेक गुन्ह्यांचे आरोप त्याच्यावर आहेत. बेंगळुरू पोलिसांनी त्याला फ्रान्समार्गे भारतात आणले.
गेल्यावर्षी सेनेगल पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासून त्याच्या प्रत्यर्पणाचे प्रयत्न सुरू होते. मात्र तिकडच्या स्थानिक न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याने तो सेनेगलमधून दक्षिण आफ्रिकेला पळून गेला होता.
मात्र काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि सेनेगल पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला पकडले आणि सेनेगलमध्ये त्याला पाठवण्यात आले होते. त्याला अटक करण्यात आल्याचे समजल्यावर त्याला आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक अमर कुमार पांडे आणि बेंगळुरू पोलीस सह आयुक्त संदीप पाटील यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांचे एक पथक सेनेगल येथे गेले होते. या पथकाने प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण केली आणि शेवटी एअर फ्रान्सच्या विमानाने त्याला बेंगळुरूला आणले.