मुंबई : भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला होता. सुरेश धस यांनी देशमुख कुंटुबीयांच्या अश्रुचा बाजार केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का? हे पहावे लागेल, असे ते म्हणाले होते. त्यावर संजय राऊतांचे वक्तव्य हा शुद्ध वेडेपणा आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. तसेच राऊतांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात भडकवण्याचे काम करू नये, असा टोला देखील लगावला.
बावनकुळे म्हणाले, संतोष देशमुखांच्या मारेकरीला फाशी व्हावी म्हणून चौकशी सुरू आहे. देशमुख हत्या ही गंभीर बाब आहे. याकडे राजकारण म्हणून बघू नये, आरोपीला फाशी झाली पाहिजे. यासाठी सरकारच्या चौकशीला सगळ्यांनी साथ द्यावी. सुरेश धस संदर्भात वारंवार प्रश्न विचारून राजकारण करू नका, असेही ते म्हणाले.
धनंजय देशमुखांची बावनकुळेंवर नाराजी
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना सुरेश धस आणि धनंजय मुंडे आंची भेट घडवण्यात जेवढा इंटरेस्ट होता, तेवढे गांभीर्य संतोष देशमुखांच्या घरी भेट घेण्याबद्दल का दाखवले नाही, असा सवाल देशमुख यांनी केला. बावनकुळे यांना महत्वाची कामे सोडून समेट करणे महत्त्वाचे वाटले. संतोष देशमुख हे दहा वर्षापासून बुथ प्रमुख होते. बावनकुळे यांनी त्या भेटीपेक्षा या भेटीला महत्त्व द्यायला पाहिजे होते, असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले.