मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक नील सोमय्या यांना आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिनचीट दिली आहे.
आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेच्या माध्यमातून युद्धनौकेसाठी जमा केलेल्या कोट्यावधींच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता पुत्रावर होता. मात्र या प्रकरणी सोमय्या पितापुत्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याची कबुली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात दिली आहे. लवकरच या प्रकरणाचा अहवाल कोर्टासमोर सादर होत सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोमय्या पीता पुत्रांना क्लिनचीट मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 2024ला हिशोब पूर्ण केला जाईल म्हणत इशारा दिला आहे. राऊत म्हणाले, कोणतही सरकार कायम असत नाही. 2024 सरकार बदलणार आहे. त्यावेळी सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल. तसेच याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहणार असल्याचे राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सरकार बदलल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्यातील एक गोष्ट म्हणजे सोमय्यांना मिळालेली क्लिनचिट आहे.
आयएनएस विक्रांतच्या संदर्भात पैसे गोळा झाले आहेत. पैशांचा अपहार झालाच असल्याचे राऊत म्हणाले. पैसे राजभवनमध्ये गेले म्हणतात. राजभवन सांगते पैसे आलेच नाही. मग हाच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा असल्याचे राऊत म्हणाले. क्लिनचिट कशी मिळते हे राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारले पाहिजे. आमच्या लोकांना मात्र, क्लिनचिट मिळत नसल्याचे ते म्हणाले. हा ईडीच्या अखत्यारीतला विषय आहे. राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित विषय आहे. ते आज सकाळी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.