राऊत यांनी घेतली पवार यांची भेट

शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार येणार असल्याचा पुनरूच्चार

नवी दिल्ली -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय संभ्रम वाढवल्यानंतर त्यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी येथे तातडीने भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार येणार असल्याच्या दाव्याचा पुनरूच्चार राऊत यांनी केला.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पवार यांनी केलेली वक्तव्ये राजकीय सस्पेन्स वाढवणारी ठरली. त्यापार्श्‍वभूमीवर, पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राऊत पोहचले. नंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनीही पत्रकारांच्या हाती फार काही लागू दिले नाही. पवार यांच्याशी झालेल्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. आमच्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली जाणार आहे.

त्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती पवार यांना केली, असे राऊत म्हणाले. सोनियांशी महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत चर्चा केली नसल्याचे पवार यांनी म्हटले. त्याबाबत विचारल्यावर राऊत उत्तरले, दोन बड्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली ते मी कसे काय विचारू शकतो? महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट जावी यावर शिवसेनेत आणि दोन्ही कॉंग्रेसमध्ये एकमत आहे.

लोकप्रिय सरकार स्थापण्याविषयीही आमच्यात एकमत आहे. चर्चा पुढे गेली की तुम्हाला सगळे समजेलचं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. यावेळी त्यांनी सर्वांत मोठ्या पक्षाने जबाबदारी झटकल्याचे सांगत राष्ट्रपती राजवटीचा ठपका भाजपवर ठेवला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)