आम्ही रालोआतून बाहेर नाही : राऊतांची गुगली आणि कल्पनांचे पतंग

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याची औपचारिक घोषणा केली नसतानाही शिवसेनेच्या राज्यसभेतील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आल्या बद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यकंय्या नायडू यांच्याकडे लेखी नाराजी व्यक्त केली. याचा संदर्भ जोडत शिवसेनेच्या भुमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात येऊ लागल्याने राजधानीत आज अनेक राजकीय पतंग उडाले.

माझी आसन व्यवस्था तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली. हे शिवसेनेचा अपमान करण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक उचललेले पाऊल आहे. हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. आम्ही रालोआतून बाहेर पडण्याची औपचारिक घोषणा केली नसताना हे पाऊल उचलण्याची गरजच काय होती, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. या कृतीमुळे सभागृहाच्या औचित्याचा भंग झाला आहे. त्यामुळे आम्हाला 1/2/3 रांगेरत स्थान देऊन सभागृहाच्या परंपरेचे पालन करावे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेबरोबर राज्य स्थापन करण्याच्या मुद्‌द्‌यावर सोनिया गांधी यांनी नो कॉमेंटस असे उत्तर दिले. त्यामुळे सरकार स्थापन होणार की नाही याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली. त्यातच शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. त्यानंतर राज्यातील संभाव्य सरकारबाबत अनेक पतंग राजधानीत उडू लागले.

कॉंग्रेसने शिवसेनेशी आघाडी करू नये अशी मागणी मुस्लिम समाजाकडून होत असल्याने कॉंग्रेस त्याबाबत तयार नाही, अशाही अटकळी स्वयंघोषित राजकीय तज्ज्ञांकडून मांडण्यात येऊ लागल्या. शरद पवार यांचे काही खरे नाही, त्यांनी महाराष्ट्रात भाजपासोबत सरकार बनवण्यासाठी शहा आणि मोदींची भेट घेतली, अशा पुड्या सोडून देण्यात आल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.