नागपुर – मराठवाडा आणि विदर्भात शिवसेनेचे शिवसंवाद यात्रा सुरू होत आहे. यासंदर्भात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपुर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेबाबत पसरवला जाणारा गैरसमज दूर करण्यासाठी ही शिवसंवाद यात्रा घेण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच यावेळी राऊत यांनी भाजपकडून शिवसेनेवर ‘जनाब’ अशी टीका केली जात आहे. त्यावरून भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले,’आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची गेल्या काही दिवसातील वक्तव्य पाहिली तर तुम्ही आरएसएसला जनाब संघ आणि मोहन भागवतांना जनाब संघाचे प्रमुख म्हणणार का? असा सवाल संजय राऊतांनी भाजपला विचारला आहे.’
ते पुढे म्हणाले,’ एक हिंदूत्वाची विचारधारा घेऊन जाणारी संघटना म्हणजे आरएसएस नागपुरात आहे. यातच मागील काही काळात सरसंघचालकांचे आपण वक्तव्य ऐकली तर तुम्ही संघालाही जनाब संघ म्हणणार का? मोहन भागवतांनी सर्वांचा डीएनए एकच आहे असं म्हटलं होतं? म्हणून ते जनाब संघाचे प्रमुख झाले का?’ असा रोखठोक सवाल विचारत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.