सूरत: गुजरातच्या सुरतजवळील कडोदरामध्ये गुजरात औद्योगिक विकास महामंडळात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. विवा पॅकेजिंग मिलमध्ये ही भीषण आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर जीव वाचण्यासाठी काही मजुरांनी पाच मजल्यावरून उड्या मारल्या. तर, काही कारागीरांना हायड्रोलिक क्रेनच्या मदतीने वाचवण्यात आले आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी आहेत. दरम्यान, आतापर्यंत 125 मजुरांना वाचवण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, घटनास्थळी उच्च अधिकारीदेखील पोहोचले आहेत.
अग्निशमन दलाने सांगितल्यानुसार, अग्निशमन दल बचाव कार्यासाठी येण्यापूर्वी काही कामगारांनी इमारतीवरुन खाली उड्या मारल्या.
सुरतचे महापौर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्याबरोबरच मदत आणि बचाव कार्यावरही भर दिला जात आहे. तसेच, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आगीचे कारणही शोधले जात आहे. यासह, या घटनेमुळे झालेल्या नुकसानीचेही मूल्यांकन केले जात आहे.