रत्नागिरी सांगून कर्नाटकी “माथी’

पिंपरी – अक्षयतृतीया आणि आंबा हे एक समीकरणच आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी बहुतेक घरांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आंबे येतातच. अक्षयतृतीयेपासून आंबे खाण्यास सुरुवात होत असल्याचे पूर्वीपासूनच मानले जाते. पूर्वी अक्षयतृतीयेच्या दिवशी प्रत्येक घरात आंब्याचा सुगंध दरवळत असे. परंतु गेल्या काही वर्षात तो सुगंध आणि कोकणच्या हापूसची अस्सल चव कुठेतरी हरवली आहे. परंपरा अजूनही तशीच आहे परंतु सुगंध मात्र हरवला आहे कारण ग्राहकांच्या माथी कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा मारला जात आहे.

या अक्षयतृतीयेला आपल्याला हवा असलेलाच आंबा थोडे निरीक्षण करुन विकत घेता येऊ शकतो. केवळ हापूसच्याच मागे न लागता इतर आंब्यांची चवही चाखता येऊ शकते कारण इतर स्वादिष्ट आंब्यांचे दरही आता सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आले आहेत. म्हणून कर्नाटकच हापूस स्वस्त कोकणमधील देवगड, रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा विकला जातो. कर्नाटक आणि कोकणमधील आंब्यात बराच फरक आहे, तरीदेखील कोकण हापूसच्या नावाखाली हा स्वस्त आंबा महागात विकला जातो.

कोकणातूनच कर्नाटकात नेण्यात आलेल्या कलमांच्या जोरावर आज कर्नाटक महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेत आहे. कर्नाटकात सपाटीकरणावर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. केवळ आठ ते दहा फुटांचे झाड देखील तिथे आंब्यांनी लगडलेले असते. यामुळे आंबा काढण्याच्या मजूरीस त्यांना खूप कमी खर्च येतो, कर्नाटकामध्ये खतांवर सबसिडी जास्त असल्याने त्यांचा खर्च कमी होतो. याउलट कोकणातील झाडे डोंगरावर किंवा उतारावर असतात. एक-एक झाड 25 ते 40 फुट उंचीचे असते. यामुळे आंबे काढण्यासाठी येणारा मजूरी खर्च अधिक असतो. तसेच महाराष्ट्रात खत ही महाग आहे, यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कर्नाटक इतक्‍या स्वस्त दरात आंबा विकू शकत नाही. याचाच फायदा घेत मोठ्या प्रमाणात कर्नाटकमधून आंबे महाराष्ट्रात विक्रीसाठी येतात. कर्नाटक हापूसची कैरी घाऊक व्यापाऱ्यांना 100 ते 150 रुपये डझन मिळते, ट्रान्सपोर्टचा खर्च धरुन ती बाजारात येईपर्यंत 200 रुपयांना मिळते.

कोकणचा हापूस आंबा
-आकाराने उत्तम असतो
-आंबा खालूनही गोल असतो
-देठापाशी सुगंध येतो
-आतून केशरी रंग असतो
-साल पातळ असते
-चवीला अवीट गोडी असते

कर्नाटक हापूस
-आकाराने बेढब
-आंब्याला खालून टोक असते
-देठापाशी सुगंध येत नाही
-आतून पिवळा रंग असतो
-साल जाड असते
-चवीला कमी गोडीचा असतो

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.