रत्नागिरी हापूसची आवक वाढली, पण…

4 ते 8 डझनाची पेटी 1,500 ते 4 हजार रुपयांना


रविवारच्या तुलनेत 500 ते हजार रुपयांनी घसरण

पुणे – रत्नागिरी हापूसची मार्केट यार्डात आवक वाढली आहे. त्यातच सध्या आयपीएल आणि निवडणुकीमुळे रत्नागिरी हापूसला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे रविवारच्या (दि. 14) तुलनेत 4 ते 8 डझनाच्या पेटीच्या भावात दर्जानुसार 500 ते 1 हजार रुपये घसरण झाली आहे. तयार आंब्याच्या पेटीला 1500 ते 4 हजार रुपये भाव मिळत आहे.

मार्केट यार्डातील फळ विभागात सध्या दररोज तीन ते साडेतीन हजार पेट्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक होत आहे. तयार मालाच्या डझनाला साधारणपणे 500 ते 800 रुपये मोजावे लागत असल्याचे सांगून व्यापारी युवराज काची म्हणाले, बाजारात सुमारे 30 ते 40 टक्के आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या पेटीला 2,000 ते 5,000 रुपये भाव मिळत होता. त्यामध्ये आता घट झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी आवक वाढेल. अक्षय तृतीयापर्यंत आंबा पूर्णपणे सर्वसामान्यांच्या आवक्‍यात आला असेल. तर व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, “बाजारात दर्जेदार आंबे उपलब्ध आहेत. चवीने गोड आहेत. नागरिकांनी आंबे खाण्याची हीच वेळ आहे. कच्चा रत्नागिरी हापूसच्या 4 ते 8 डझनाच्या पेटीला 1200 ते 3000 रुपये भाव मिळत आहे.’

कर्नाटक हापूस रुसलेलाच
कर्नाटकातील आंब्याची अपेक्षित आवक होत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ निम्मीच आवक होत आहे. तेथे फेब्रुवारीपर्यंत झाडाला चांगला मोहोर होता. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ झाली. त्यामुळे बहुतांश मोहोर आणि छोटे आंबे गळाले. सध्या पुण्यात येणाऱ्या आंब्याचा आकार लहान आणि मध्यम स्वरूपाचा असून, अपेक्षित दर्जाही नाही, असे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले. कर्नाटक हापूसच्या 4 ते 5 डझनाच्या पेटीला 1,000 ते 1,600 रुपये, तर पायरीच्या चार डझनाच्या पेटीला 500 ते 800 रुपये भाव मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.