न्हावरे(प्रतिनिधी) :- आलेगाव पागा (ता.शिरूर) येथील रेशनिंग दुकानामध्ये हरबरा डाळ व तूरडाळ वितरणाबाबत ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून महसूल विभागाने केलेल्या चौकशी दरम्यान अनियमितता व घोळ आढळून आला आहे. त्यामुळे या रेशनिंग दुकानाची चौकशी सुरू असून, दुकान चालकाला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच संबंधित रेशन दुकानदाराला दुकान बंद ठेवण्याचा आदेश शिरूरचे नायब तहसीलदार (महसूल) ज्ञानदेव यादव यांनी दिला आहे.
त्याचप्रमाणे रेशनिंग दुकानाबाबत ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात येऊन कार्डधारक ग्राहकांचे जबाब घेतले. त्यामध्ये हरभरा डाळ व तूरडाळ यांचे येथील स्वस्त धान्य दुकानात वितरणच झाले नसल्याचे ग्राहकांनी सांगितले. तसेच इतर वेळेस रेशनिंग दुकानातून धान्य घेतल्यानंतर मालाच्या तपशिलाच्या पावत्या मिळत नाहीत,अशाही तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या.
त्यामुळे डाळींच्या वितरणाबाबत घोटाळा आढळून आला असून, येथील रेशनिंग दुकान चालवत असलेल्या यशोदा महिला बचत गटावर परवाना रद्द होऊन फौजदारी कारवाई होऊ शकते,अशी शक्यता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. परंतू , रेशनिंग दुकानाचा चालवता धनी कोण याबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.