आता तूरडाळ महागण्याची शक्यता

आपल्या स्वयंपाकाचे बजेट बिघडणार

सतत बदलत्या हवामानामुळे कर्नाटक व महाराष्ट्रात तुरीच्या पिकाचे नुकसान झाले. या वर्षी उत्पादन कमी राहील. सरकार मार्चमध्ये आयात परवान्याचा निर्णय घेणार आहे. विलंब झाल्यास अडचणी वाढू शकतात. बहुतांश घरांत प्रामुख्याने वापरली जाणारी तूरडाळ आपल्या स्वयंपाकाचे बजेट बिघडवू शकते. तूरडाळीची प्रमुख उत्पादक राज्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे पिकांचे बरेच नुकसान झाले आहे.

यामुळे या वर्षी तुरीचे एकूण उत्पादन मागणीपेक्षा कमीत कमी २० लाख टन होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात तूरडाळीच्या किमतीत वाढ पाहायला मिळू शकते.

देशात तुरीच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक महाराष्ट्रातील अकोल्यात तुरीचा भाव १९ जानेवारीला ५८०० रु. क्विंटल होता. हा गेल्या वर्षीच्या समान अवधीत ४३०० रु. प्रतिक्विंटल होता. म्हणजे सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाली. मात्र, हा किमान हमीभावाच्या(६००० रु. प्रतिक्विंटल) तुलनेत कमी आहे. अॅग्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, या वर्षी तूर पेरणी क्षेत्र चांगले होते. मात्र, हवामान अनुकूल नसल्याने तुरीच्या उत्पन्नात मोठी घट येऊ शकते. गेल्या वर्षी जवळपास ४२.५ लाख टन तुरीचे उत्पादन झाले होते. मात्र, या वर्षी घटून ३३ लाख टन राहण्याचा अंदाज आहे.

मागणी-पुरवठ्यातील फरकामुळे तूरडाळीचे भाव आधीच १४ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, तूरडाळीचे भाव एका वर्षात ९२ रु. किलोपर्यंत वाढून ११० रु. प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. सूत्रांनुसार, या वर्षी उत्पादनात घट येईल, असा सरकारलाही अंदाज आहे. ३८ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. तुरीचा राखीव साठा केवळ ३ लाख टन शिल्लक आहे, ही सरकारसाठी चिंतेची बाब आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.