Ratan Tata Will: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूपत्राविषयी बरीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाली आहे. आता त्यांच्या मृत्यूपत्रातील काही माहिती समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीला 500 कोटी रुपये देण्याचा उल्लेख आहे. एवढी मोठी रक्कम ज्या व्यक्तीला देण्याचा उल्लेख आहे, त्यांच्याबद्दल जगाला फारशी माहिती नाही. ही व्यक्ती आहे मोहिनी मोहन दत्ता.
टाटांच्या मृत्यूपत्रातील मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावामुळे सर्वच चकित झाले आहेत. यामागचे कारण म्हणजे आतापर्यंत त्यांचे नाव रतन टाटांसोबत कधी जोडले गेले नव्हते. दत्ता हे टाटा कुटुंबाशी संबंधित नसल्याने हे नाव चर्चेत आहे. विशेष म्हणजे मोहिनी मोहन दत्ता यांना मिळणारे 500 कोटी रुपये हे रतन टाटा यांच्या एकूण संपत्तीच्या एक तृतीयांश इतके आहेत.
कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?
मोहिमी मोहन दत्ता यांची रतन टाटा यांच्या पहिली भेट 1960च्या दशकात जमशेदपूरच्या डीलर्स हॉस्टेलमध्ये झाली होती. त्यावेळी टाटा यांचे वय 24 वर्ष होते. दत्ता यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ताज ग्रुपसोबत केली होती. त्यानंतर त्यांनी Stallion ट्रॅव्हल एजन्सी नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. ही कंपनी पुढे ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या ताज सर्व्हिसेजसोबत विलीनीकरण करण्यात आले.
रिपोर्टनुसार, दत्ता हे रतन टाटा यांनी गिफ्ट केलेली संपत्ती स्वीकारण्यास तयार आहेत. परंतु त्यांच्या मते ही रक्कम सुमारे 650 कोटी रुपये असायला हवी. रतन टाटा यांच्या संपत्तीचे मूल्यमापन अद्याप झालेले नाही, परंतु असे मानले जात आहे की ही संपत्ती 650 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, रतन टाटा हे जवळपास 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेवून गेल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूपत्रात मित्र आणि टाटा ट्रस्टचे सर्वात तरुण जनरल मॅनेजर शांतनु नायडू, भाऊ जिम्मी टाटा, सावत्र बहिणी शिरीन आणि डिएना जीजीभॉय व इतर व्यक्ती आणि पाळीव कुत्रा टीटो (Tito) याच्या नावाचा देखील समावेश आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतरच मृत्यूपत्रातील संपत्तीचे वाटप होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा महिने लागू शकतात.