रासप मेळाव्यात महादेव जानकर यांची भाजप- शिवसेनेला गुगली
रेडा- भाजप – शिवसेना व मित्रपक्षाबरोबर रासपची युती विधानसभेला ठरली आहे. परंतु आमच्या पक्षाची ताकद इंदापूर तालुक्यात वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इंदापूर विधानसभेची जागा रासपला मिळाली पाहिजे, यासाठी मी आग्रह धरला आहे. जवळपास ही जागा 80 टक्के रासपला मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गुगली टाकली. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून आता नवे राजकीय वळण मिळणार आहे. इंदापूर शहरात राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्ता मेळावा मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, पुणे शहर अध्यक्षा सविता जोशी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे,दादासाहेब केसकर, आण्णा पाटील, तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे, सतीश तरंगे, गणेश हेगडकर, ऋषि मदने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जानकर म्हणाले की, मी काय इंदापूर तालुक्याला नवीन नाही. माझे जुने ऋणानुबंध आहेत. बारामती लोकसभेचा खासदार मी एकदातरी होऊनच दाखवेल. मागेच बारामती लोकसभेचा खासदार झालो असतो. परंतु इंदापूर तालुक्यातील जनतेने मला साथ दिली नाही. मात्र, दौंड तालुक्याने मला मोलाची मदत केली. इंदापूर तालुक्यातील जनतेची मला गरज आहे. मला बारामतीचे खासदार व्हायचे आहे म्हणून कधीही इंदापूर तालुक्यावर दुर्लक्ष करणार नाही, असा शब्द जानकर यांनी दिला.
रासपला विधानसभेसाठी इंदापूर तालुक्यातून युतीमध्ये संधी मिळाली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जवळपास 75 जागांची मागणी भाजपकडे केली आहे. आमच्या पक्षाने केलेल्या मागणीचा विचार भाजप व मित्र पक्षांकडून नक्कीच केला जाईल. येत्या विधानसभेतील उमेदवारांमध्ये रासपचा चांगला हिस्सा असेल. भाजप सरकारने माझ्याकडे आई आणि गाईची जिम्मेदारी दिली आहे. त्यामुळे ही जिम्मेदारी मनापासून पार पाडतो आहे. राज्यातील महिलांच्या नावावर दुधाचे खाते उघडले जाईल. दुधाचा पगार महिला भगिनींच्या नावावर निघेल. राज्यात महिला बचत गट साडेसात हजारांपेक्षाही अधिक आहेत. या बचत गटांना आर्थिक स्वरूपात आधार देण्यासाठी 75 टक्के अनुदान शासनाकडून दिली जाईल. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले की, राज्यांमध्ये जवळपास शंभर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून विधानसभेची तयारी परिपूर्ण केली आहे. यामध्ये इंदापूर तालुक्याचा आमदार यंदा रासपचा असेल.
- मी रासपच्या एबी फॉर्मवर आमदार
महिलांसाठी कुक्कुटपालनाचे गट पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येतील. जपानची सत्ता आईच्या हातात असल्यामुळे जपान प्रगत झाले आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील महिला सक्षम बनवण्याचे धोरण रासपने आखलेले आहे. महिला बचत गटांना भरीव अर्थसहाय्य पुरवले जाईल. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने जवळपास एक हजार कोटीचे बजेट जाहीर केले आहे मला समाजातील लोकांना उल्लू बनवायचे नाही मात्र धनगर आरक्षणासाठी कायम मी आग्रही राहून शासनाकडून परिपूर्ण करून घेईल. रासप ही 17 राज्यांमध्ये राजकीय प्रवास करीत आहे. विधानपरिषदेचे आमदार होताना मी रासपच्या एबी फॉर्मवर आमदार झालो आहे .त्यामुळे मी भाजप, शिवसेनेचा कधीच नाही असाही खडा सवाल महादेव जानकर यांनी व्यक्त केला.