मॉस्को -रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टीन करोनामुक्त झाल्याने पुन्हा सक्रिय झाले आहेत. मिशुस्टीन यांना करोना संसर्ग झाल्याची माहिती 30 एप्रिलला समोर आली. त्यानंतरच्या उपचारामुळे ते पूर्ण बरे झाले आहेत.
प्रकृती ठणठणीत झाल्याने मिशुस्टीन यांनी मंगळवारपासून सरकारी कामकाज सुरू केले. जगातील इतर प्रमुख देशांप्रमाणेच रशियातही करोना संकट गडद बनले आहे. त्या देशातील काही मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली.
एवढेच नव्हे तर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या प्रवक्त्यालाही करोनाची बाधा झाली. त्यापार्श्वभूमीवर, स्वत: पुतिन यांनी सार्वजनिक ठिकाणचा वावर मर्यादित ठेवला आहे. ते बहुतांश सरकारी कामकाज आणि विशेषत: सरकारी बैठका ऑनलाईन स्वरूपात घेत आहेत. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाबाधा झाली होती. तेही बरे होऊन याआधीच सक्रिय झाले आहेत.