नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा संपन्न

मुख्यमंत्र्यांसह नितीन गडकरींची उपस्थिती

नागपूर : आज विजयादशमीचा सण देशभर साजरा होत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पथसंचलन केले. नागपुरमधील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. त्यांपूर्वी मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडले. या मेळाव्याला एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंगदेखील संघाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते.

“देशात केवळ एकाच समाजाने दुसऱ्या समाजावर अत्याचार केलेत असेच घडत नाही, तर अन्य समाजातील लोकही इतर समाजावर अत्याचार करतात. एखाद्या समुदायातील काही लोकांनी लोकांनी कोणावर अत्याचार केले याचा अर्थ संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही. अशा हिंसक घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीएक संबंध नसतो. याउलट संघ अशा घटना रोखण्याचे काम करत असल्याचे” भागवत म्हणाले. “आमच्याकडे लिंचिंग हा शब्द कधीच नव्हता. तो शब्द बाहेरून आला, असंही ते म्हणाले. हा भारत आपला आहे. सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत सर्वांनी राहिलं पाहिजे,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

2014 मध्ये ज्या सरकारला निवडलं त्यांना 2019 मध्ये त्याच सरकारला आणखी मोठ्या संख्येनं निवडून दाखवलं. जनतेनं पुन्हा भाजपावर विश्वास दाखवला. लोकशाहीत जनतेच्या मतांवर शासन चालतं. लोकशाही भारताला नवीन नाही. प्राचीन काळापासून ही व्यवस्था भारतात होती. लोकशाही आम्ही पश्चिमी देशांकडून घेतली असं पश्चिमी राष्ट्रांनी हे समजू नये,” असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

“सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ सरकारने एकट्याने घेतला नसून त्या निर्णयाला इतर राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच सत्तेतील प्रत्येकाचं स्वागत व्हायला हवं असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)