‘राष्ट्रीय किसान मंच’ उत्तर प्रदेशात सर्व जागा लढवणार

नवी दिल्ली –  उत्तर प्रदेश विधानसभेसाठी पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय किसान मंच सर्व 403 जागा लढवणार असल्याची घोषणा या मंचाने केली आहे. त्याबाबतचे निवेदन जारी करण्यात आले असून भारतीय जनता पार्टीचे सरकार शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांच्या हितासाठी कार्यरत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.

राष्ट्रीय किसान मंचचे अध्यक्ष शेखर दीक्षित म्हणाले की, गेल्या सात महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, भांडवलदारांच्या लाभासाठी सरकारने या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. सरकारने 2017 मध्ये शेतकऱ्यांना अनेक आश्‍वासने दिली होती, ती सगळी खोटी ठरली आहेत.

कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या सगळ्यांच पक्षांचा कारभार आपण पाहिला आहे. सत्तेत आल्यावर सगळ्याच पक्षांचे सूर बदलून जातात. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतला असून पुढच्या काही महिन्यांत 1 लाख सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे आमचे लक्ष्य असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.