डॉ. संभाजी काळे : प्रीतम प्रकाश महाविद्यालयात मार्गदर्शन
भोसरी – देशातील युवा शक्तीला योग्य दिशा देऊन श्रमाला प्रतिष्ठा मिळून देण्याचे अनमोल कार्य राष्ट्रीय सेवा योजनद्वारे केले जात असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संभाजी काळे यांनी केले.
भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रासेयो सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या “राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन’ कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन भगवान वीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अशोककुमार पागारिया यांच्या हस्ते केले. राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त दर्पेश डिंगर याने राष्ट्रीय सेवा योजनेबाबत मनोगत व्यक्तकेले. प्राचार्य डॉ. अशोक शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्तकेले. डॉ. संभाजी काळे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. पगारिया यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच विद्यापीठ व राज्य पातळीवरील विविध उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रासेयो विभाग समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. हनुमंत शिंदे व रासेयो स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य सदाशिव कांबळे, प्राध्यापक व रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवदास कांबळे या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. साक्षी बोंबले हिने सूत्रसंचालन केले तर प्रतीक्षा जाधव हिने आभार मानले.