बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथील कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील 5 उमेदवार जाहीर केले. नावाची घोषणा झाल्यानंतर उपस्थितीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
राष्ट्रवादीचे एक एक करून मोठे नेते पक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेत दाखल होत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी प्रचाराची सर्व धुरा आणि पक्षाला उभारी देण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. मंगळवारी ते सोलापुरात होते तर ते बुधवारी बीडमध्ये दाखल झाले होते. बीडमधील मेळाव्यात बोलताना पवार यांनी परळी विधानसभा मतदार संघासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा केली. तर गेवराई विधानसभा मतदार संघासाठी विजयसिंह पंडित यांच्या नावाची घोषणा केली. केज विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून विमल मुंदडा यांच्या कार्याचा विस्तार करणाऱ्या नमिता मुंडदा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच बीडमधून संदीप क्षीरसागर आणि माजलगावमधून प्रकाश सोळंके असे पाच उमेदवार जाहीर केले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत या पाच पैकी चार जागांवर भाजप आणि एका जागेवर राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला होता. यातील बीडमधील जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून आता शिवसेनेचे शिवबंधन आपल्या हातात बांधले आहे. गेवराईतून भाजपचे लक्ष्मण पवार, माजलगाव येथून भाजपचे आर. टी. देशमुख, केजमधून भाजपच्या संगिता ठोंबरे आणि परळीमधून भाजपच्या पंकजा मुंडे निवडून आल्या होत्या. बीड शहर सोडता इतर सर्व मतदारसंघातील सर्व उमेदवारांना राष्ट्रवादीने पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे परळी मतदार संघामध्ये पुन्हा बहिण-भावांमध्ये लढत होणार आहे. तर बीड मतदार संघामध्ये काका-पुतण्यांमध्ये लढत होणार आहे.