रॅश ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणा अपघाती मृत्यूस कारणीभूत

रात्रीच्या वेळी दुपटीने वाढते अपघातांची शक्‍यता


अपघात टाळण्यासाठी स्वत: घ्यावी जबाबदारी


नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोचा महत्त्वाचा अहवाल

– संजय कडू

पुणे – भारतात दर तासाला 19 व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. तर रस्ते अपघातातील तब्बल 90 टक्‍के मृत्यू हे “रॅश ड्रायव्हिंग’ आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे होत असल्याचे नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोने समोर आणले आहे. असे असले, तरी अपघातासारखी सहज टाळता येणारी गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. हेल्मेट आणि सीटबेल्ट लावला, तरी अनेक अपघातांतील मृत्यू टळतील. अनिवार्य हेल्मेट व अनिवार्य सीटबेल्ट ही अपघात रोखण्यासाठीची कायमस्वरूपी उपाययोजना असू शकत नाही. तो उपाययोजनांचा एक भाग असू शकतो, पण त्यासाठी अपघात टाळण्यासाठी स्वतःच स्वतःची जबाबदारी घ्यायला हवी, असे आवाहन पोलीस करत आहेत.

रात्रीचा प्रवास जीवघेणाच
राष्ट्रीय महामार्गांवर होणाऱ्या भीषण अपघातांमध्ये 70 टक्के वाहनचालकांच्या रक्‍तात मद्याचे प्रमाण आढळून येते. कामाच्या अतिताणामुळे वाहनांचे अपघात होतात. साधारणतः 6 ते 8 तासांच्या प्रवासानंतर अपघातांची शक्‍यता वाढते. तसेच वेळेची बचत करण्यासाठी रात्रीच्या प्रवासाकडे जास्त कल असतो. रात्रीच्या वेळी अपघातांची शक्‍यता दुपटीने वाढते. मात्र, रस्ता मोकळा असल्याने तसेच वेळ वाचवण्यासाठी नागरिकांचा रात्रीच्या प्रवासाकडे कल असतो. खासगी लक्‍झरी बसेसही रात्रीच्याच धावतात.

“रॅश ड्रायव्हिंग’ आणि तरुणाई
तरुणांमध्ये “रॅश ड्रायव्हिंग’ची मोठी “क्रेझ’ असते, अगदी शहरात भर गर्दीच्या वेळेसही “झिकझॅक’ पद्धतीने ट्रीपल सीट दुचाकी चालवणारे सहज दिसतात. यामुळे अपघातांमध्ये तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे दिसून येते. शहरात होणाऱ्या अपघातांचा अभ्यास करता, रात्रीच्या वेळी दुचाकींच्या झालेल्या अपघातात “रॅश ड्रायव्हिंग’ किंवा रस्त्याचा अंदाज न आल्याने स्वत:हून धडकून मृत्यू पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. रस्ता दुभाजक आणि विजेच्या खांबाला धडक बसणे, दुचाकी नियंत्रणाबाहेर जाऊन घसरणे किंवा समोरच्या वाहनांना धडक देणे यामुळे रात्रीचे अपघात झालेले दिसतात. यातच रात्रीच्या वेळी वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्यामुळे जखमींच्या मृत्यूचा धोका वाढलेला असतो.

रस्त्यांची दुरवस्थादेखील कारणीभूत
नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोने केलेल्या सर्वेक्षणात, “रॅश ड्रायव्हिंग’ आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याने 90 टक्के मृत्यू झाले आहेत. देशभरात झालेल्या 1 लाख 35 हजार अपघातांत 1 लाख 51 हजार व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये 80.3 टक्के चूक ही चालकांची होती. तर अपघातांचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, रस्यावरील वाहनांची बेशिस्त आणि रस्त्यांची दुरवस्थादेखील वाढत्या अपघातांना कारणीभूत आहे.

…शरीरावर भयंकर आघात
साधारणतः ताशी 60 कि.मी. वेग असताना होणाऱ्या अपघाताचा शरीरावर होणारा परिणाम हा 12व्या मजल्यावरून जमिनीवर आदळल्यासारखा होतो. ही बाब लक्षात घेतल्यावर दुचाकी चालक वेगाने रस्त्यावर पडला तर त्याच्या शरीराला बसणारा मार किती असेल, हे लक्षात येते. त्याने हेल्मेट परिधान केले नसेल तर मृत्यू अटळच समजला जातो.

पुण्यात वर्षभरात 269 जणांचा मृत्यू
पुणे शहरातील अपघातांची आणि अपघाती मृत्यूंची संख्याही विचार करण्यास लावणारी आहे. सन 2018 मध्ये एकूण 874 अपघांमध्ये 269 जणांचा मृत्यू, 411 गंभीर जखमी आणि 231 किरकोळ जखमी झाले आहेत.

वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेषत: शहरालगतच्या महामार्गांवर जड वाहन चालकांचे “रॅश ड्रायव्हिंग’ किंवा निष्काळजीपणे वाहन चालवण्याचे प्रमाण जास्त आहे. तर शहराअंतर्गत “रॅश ड्रायव्हिंग’, खड्डे व इतर गोष्टींचा अंदाज न आल्याने स्वत:हून धडकून दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रकार घडले आहेत.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्‍त, वाहतूक शाखा.

Leave A Reply

Your email address will not be published.