अवकाळी पाऊस, वादळांवरून राजकारण नको : पंतप्रधानांची विरोधकांना विनंती 

हिम्मतनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हिम्मतनगर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना चार राज्यांमध्ये पडलेल्या अवकाळी पाऊस तथा वादळांवरून विरोधकांनी राजकारण करू नये असे आवाहन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुजरात, राजस्थान, आणि मध्यप्रदेशमध्ये सध्या अवकाळी पाऊस तथा वादळाने हैदोस घातला असून यामध्ये ५०हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. दरम्यान आज सकाळी पंतप्रधान कार्यालयातर्फे ट्विटरद्वारे या नैसर्गिक आपत्तीबाबत दुःख व्यक्त करण्यात आले तसेच पंतप्रधानांच्या कोट्यातून या नैसर्गिक आपत्तीमध्ये गुजरातच्या विविध भागातील जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात येतील अशी माहिती देखील देण्यात आली होती.

मात्र, पंतप्रधान कार्यालयाद्वारे केवळ गुजरात राज्याचा उल्लेख करण्यात आल्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदींवर हल्ला चढवला होता. कमलनाथ यांनी मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान नसून संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत असं म्हंटल होतं.

दरम्यान, कमलनाथ यांनी केलेल्या टीकेला पंतप्रधानांनी प्रतिउत्तर दिले असून ते म्हणाले, “मी विरोधकांना विनंती करतो की या दुःखद समयी विरोधकांनी राजकारण करू नये. निवडणुका येतात आणि जातात मात्र आपण जे दुःखात आहेत त्यांना मदत करायला हवी.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.