पुणे – पुणे जिल्ह्यातील इंदापूर जवळील एका गावात दुर्मिळ युरेशियन अॉटर (पाणमांजर) आढळून आले आहे. हे एका विहिरीत पडले होते. तब्बल सात तासांच्या रेस्क्यू अॉपरेशन नंतर त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि त्याला पुण्यातील रेस्क्यू सेंटर मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
इंदापूर येथील वनविभागातील कर्मचाऱ्यांना निमगाव केतकी गावाजवळील गोतोंडी गावाजवळील विहिरीत पडलेल्या या पाणमांजरा विषयी माहिती मिळाली. कर्मचारी आनंद हुकिरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि दौंड येथील रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. हे पथक आल्यानंतर त्यांनी पाहिले असता या दुर्मिळ प्राण्याच्या दर्शनाने तेही अचंबित झाले.
स्थानिक वनरक्षक मिलिंद शिंदे, अनंत हुकिरे, शुभम कडू आणि शुभम धैतोंडे आणि रेस्क्यू टीम सदस्य, नचिकेत अवधानी, प्रशांत कौलकर, डॉ. श्रीकांत देशमुख यांनी परिस्थितीचे आकलन केले आणि त्वरीत बचाव योजना आखली. ऑटो-ट्रॅप पिंजरा वापरून त्याला पकडण्यात आले. हे अॉपरेशन सात तास चालले. त्यानंतर त्याला मध्यरात्री रुग्णवाहिकेतून पुण्यातील वन्यजीव संक्रमण उपचार केंद्रात नेण्यात आले.
१९९० मध्ये उजनी पाणलोट क्षेत्रात या पाणमांजराचे अस्तित्त्व नोंदवले होते. त्यानंतर याचे दर्शन कधीच झाले नाही आणि अचानक तो सापडणे हा वन्यजीव अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरला आहे.
काय आहे याचे वैशिष्ट्य…
भारतात या पाणमांजराच्या तीन प्रमुख प्रजाती आढळतात. भारतात ही सध्या खूप दुर्मिळ प्रजाती मानली जाते. मुख्यत्त्वे हिमालयाच्या पायथ्याशी, इशान्य भारतातील काही भागातताअणि पश्चिम घाटात या प्रजातींचे वास्तव्य आहे. युरेशियन अॉटर्स हे स्वच्छ, गोड्या पाण्यात राहणे पसंत करतात. मुख्यत्त्वे नद्या, तलाव आणि मुबलक मासे असलेले दलदल अशा ठिकाणी ते राहतात. ते एकटे राहतात, हा प्रामुख्याने निशाचर प्राणी आहे. प्रामुख्याने यांची वस्ती ही पाणथळ जागेतच असते.
“सध्या हे पाणमांजर आमच्या संस्थेत देखरेखीखाली सुरक्षित आहे. त्याला जास्तीत जास्त नैसर्गिक अधिवास मिळावा असा प्रयत्न केला जात आहे. त्याचे कॅमेऱ्याद्वारे २४ तास निरीक्षण केले जात आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. त्यामुळे त्याचे संपूर्ण वैद्यकीय मूल्यमापन करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.”
– नेहा पंचमिया, संस्थापक अध्यक्ष, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट