शिकारी गरुडांची प्रजात : राज्यात प्रथमच दर्शन झाल्याचा तज्ज्ञांचा दावा
पुणे – राज्यात शिकारी गरुडांच्या “हॉक’ प्रजातीमधील अत्यंत दुर्मीळ असा “लेगस हॉक’ हा पक्षी आढळला आहे. माथेरानच्या जंगलात या पक्षाची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली आहे. राज्यात प्रथमच हा पक्षी दिसल्याचा दावा केला जात आहे. धोकादायक प्रजातीतील पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट या पक्षाची राज्यात नोंद होणे हे नक्कीच आनंदाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील पक्षी निरीक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हौशी नागरिक पुढे येत आहेत. यासाठी त्यांना पक्षी अभ्यासकांचीदेखील साथ मिळत आहे. अशाच एका उपक्रमादरम्यान हौशी छायाचित्रकार आणि पक्षीनिरीक्षक असलेल्या मनीष केरकर यांना अत्यंत दुर्मीळ अशा “लेगस हॉक’ या पक्षाची नोंद मिळाली. माथेरानच्या जंगलात दुपारी पक्षी निरीक्षण करताना त्यांना शिकारी पक्षी आकाशात घिरट्या घालताना आढळला.
छायाचित्र टिपल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, हा पक्षी शिकारी गरुडांच्या “हॉक’ प्रजातीमधील अत्यंत दुर्मीळ “लेगस हॉक’ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी मुंबईतील पक्षी अभ्यासक आदेश शिवकर यांच्याशी संपर्क साधला असता, हा पक्षी म्हणजे “लेगस हॉक इगल’च असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षी निरीक्षणाबद्दल वाढत्या प्रबोधनामुळे अशा महत्त्वाच्या नोंदी समोर येत असल्याचे मत पक्षी निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.