बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यावी; पाकिस्तानातील खासदार महिलांची मागणी

इस्लामाबाद – पाकिस्तानातील बलात्कारांचे प्रमाण कमी करण्यासाठी बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यावी, अशी एकमुखी मागणी पाकिस्तानातील खासदार महिलांनी केली आहे.

पाकिस्तानातील सत्तारुढ पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ बरोबर पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गट आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार महिलांनी काल संसदेमध्ये ही मागणी केली.

बलात्काराच्या गुन्ह्यांचा निकाल त्वरित लावण्यात यावा आणि दोषींना सार्वजनिकपणे फासावर लटकवले जावे, अशी मागणी सर्व 69 खासदार महिलांनी एकमताने संसदेत केली आहे, अशी माहिती विरोधी पीएसएल-एल च्या खासदार सईदा नोशीन इफ्तकार यांनी दिली. बलात्काराच्या प्रकरणांचा फेरविचार करण्यासाठी संसदीय समिती स्थापन करण्यात यावी अशीही मागणी या खासदार महिलांनी केली आहे.

जर पाकिस्तानचा करभार सुरू ठेवायचा असेल तर बलात्कार आणि त्यातील दोषींना सार्वजनिकपणे फासावर लटकवले जायला हवे, असे सत्तारुढ पीटीआय पक्षांच्या खासदार अस्मा कादिर यांनीही म्हटले आहे.

महिला आणि बालकांवरील लैंगिक आत्याचारांबाबत संसदेत बोलताना त्यांना अश्रु अनावर झाले होते. अलिकडेच पाकिस्तानचे वरिष्ठ मुत्सदी शौकत मुकादम यांची कन्या नूर मुकादम हिचीही इस्लामाबादेत हत्या झाली होती.

गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान देशातील बलात्कारांचे प्रमाण 200 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे ह्युमन राईटस वॉच या संस्थेने दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.