चिंताजनक ! ‘डबल म्युटेशन व्हायरस’मुळे करोनाचा वेगाने प्रसार; होम क्वारंटाईन रुग्णांच्या कुटुंबीयांना होऊ शकते ‘बाधा’

पुणे – राज्यातील जिल्हावार प्रयोगशाळांशी गेल्या आठवड्यात झालेल्या सविस्तर चर्चेनंतर राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेने काहीसा तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार 362 सॅम्पलची जनुकीय संरचना (जिनोम सिक्वेन्सेस) तपासण्यात आले. त्यात 220 नमुन्यांमध्ये दुहेरी उत्परीवर्तन (डबल म्युटेशन) आढळून आले आहे. म्हणजे हे प्रमाण 61 टक्के आहे. या उत्परिवर्तनाचे वर्गीकरण बी.1.617 असे करण्यात आले आहे.

सार्स -कोव्ह-2 च्या बी.1.617 विषाणूमध्ये ई 484 क्‍यू आणि एल 452 आर हे विषाणू आढळून आले आहेत. या पुर्वी करोनाबाधितांमध्ये हे विषाणू स्वतंत्रपणे आढळत होते. मात्र, भारतात प्रथमच हे विषाणू एकत्रितपणे आढळत आहेत. हे दोन बदल विषाणूंच्या काटेरी प्रथिनांमध्येही आढळत आहेत. हे काटेरी प्रथिने मानवी पेशींमध्ये शिरण्यास आणि लपण्यास मदत करत आहेत.

ई 484 क्‍यू विषाणू हा इ 484 के सारखाच आहे. हा इंग्लंडमध्ये (वंशावळ बी.1.1.7) आणि द. अफ्रिका (बी.1.351) हा विषाणू आढळत असे. एल 452 आर हा विषाणू सर्वात वेगाने प्रसार होणाऱ्या कॅलिफोर्निया भागात (बी.1.427 आणि बी.1.429) आढळत असे. मानवी पेशीतील एसीई 2 पासून त्याची काटेरी प्रथिने विषाणूला संरक्षित करतात. तसेच त्याची संसर्ग क्षमता अधिक आहे.

ई 484 क्‍यू आणि एल 452 आर हे एकत्रितपणे अधिक संसर्गशील आहेत आणि ते प्रतिपिंडांपासून स्वत:ला वाचवू शकतात. याबाबतचा अत्यंत मर्यादित तपशील महाराष्ट्रातून प्रथमच उघड करण्यात आला आहे. जानेवारीत 16 नमुन्यांची जनुकीय संरचना तपासण्यात आली. त्यावेळी चार जणांमध्ये बी.1.617 हा विषाणू आढळला होता. फेब्रुवारीत 16 जिल्ह्यातून गोळा केलेल्या 234 नमुन्यातील जनुकीय संरचना तपासण्यात आली. त्यावेळी 16 जिल्ह्यातील 151 नमुन्यात हा विषाणू आढळला. मार्च महिन्यात 94 नमुन्यांपैकी 65 नमुन्यांत हा विषाणू आढळला.

आतापर्यंत पुणे, अमरावती, नागपूर, अकोला, वर्धा, ठाणे औरंगाबाद आणि चंद्रपूर जिल्ह्यात बी.1.617 हा विषाणू असल्याचे पुरेसे पुरावे मिळाले आहेत. अन्य काही जिल्ह्यात काही किरकोळ प्रमाणात या विषाणूचे अस्तित्व आढळत आहे. मोठ्या प्रमाणातील नमुन्यांचे जनुकीय विश्‍लेषण बाकी आहे.

सध्या बहुतांश बाधित गृहविलगीकरणात आहेत. याबाबत डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार हा विषाणू अधिक संसर्गशिल असल्याने त्याची बाधा सर्व कुटुंबाला होऊ शकते. मात्र त्याची हानी क्षमता कमी असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. त्याबाबतचे पुरावे त्यामुळे अद्याप उपलब्ध झाले नाहीत.

बहुतांस बाधितांमध्ये लक्षणे आढळत नाहीत. हे चांगले चिन्ह आहे. मात्र मोठ्या संख्येने आढळणाऱ्या रुग्णामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत आहे.
डॉ. शशांक जोशी
राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.