मुंबई – अपेक्षेप्रमाणे गुरुवारी शेअरबाजारात कमालीची अस्थिरता होती. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे वेळापत्रक जाहीर करतानाच अर्थव्यवस्था वाढणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे थोडीफार खरेदी होऊन निर्देशांक वाढले.
मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येते.बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 113 अंकांनी वाढून 57,901 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 27 अंकांनी म्हणजे 0.16 टक्क्यांनी वाढून 17,248 अंकांवर बंद झाला.
माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक वाढले तर रिऍल्टी, बॅंकिंग, ऊर्जा, क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. बजाज फायनान्स, इन्फोसिस, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर मारुती, आयसीआयसीआय बॅंक, बजाज ऑटो, सन फार्मा, इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंकेच्या शेअरच्या भावात घट झाली.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरूच
फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ होणार असली तरी रोजगार वाढून अर्थव्यवस्था बळकट होणार असल्याचे सांगितल्यानंतर जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. अमेरिकेच्या शेअर बाजार निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर आहेत.
मात्र भारतातून परतावा कमी होईल म्हणून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच आहे. काल या गुंतवणूकदारानी 3,407 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. त्यामुळे आजही निर्देशांक अपेक्षित प्रमाणात वाढू शकले नाहीत.
या गुंतवणूकदारांनी विक्री चालू ठेवली तर भारतीय निर्देशांकात करेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बऱ्याच विश्लेषकांनी सांगितले.