सिमला – हवाई दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या “राफेल’ लढाऊ विमानांनी उड्डाणाचा सराव सुरू केला आहे. हिमाचल प्रदेशच्या डोंगर रांगांमध्ये रात्रीच्या अंधारात राफेल विमानांच्या उड्डाणाचा सराव सुरू झाला आहे. चीनला लागून असलेल्या 1,597 किलोमीटरच्या लडाख सीमारेषेवर अजूनही तणावाची स्थिती आहे. उद्या परिस्थिती चिघळली तर लगेच प्रत्युत्तराची कारवाई करण्याच्या दृष्टीने राफेलने रात्रीचा युद्धसराव सुरू करण्यात आला आहे.
राफेलच्या पहिल्या तुकडीने 29 जुलैला भारतात आगमन झाले. या पहिल्या तुकडीत पाच राफेल विमाने आहेत. अंबाला एअर बसेवर राफेलची गोल्डन ऍरो स्क्वाड्रन तैनात असते. राफेलच्या एकूण दोन स्क्वाड्रन असणार आहेत. पहिली स्क्वाड्रन अंबाला बेसवर तर दुसरी भूतान जवळच्या हाशिमारा बेसवर तैनात असेल.
फ्रान्सबरोबर केलेल्या 36 विमानांसाठीच्या करारानुसर 2022 पर्यंत टप्याटप्याने ही विमाने भारताला मिळतील. अक्साई चीनमधील “पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या रडारना राफेलचे फ्रिक्वेन्सी सिग्नेचर मिळू नयेत, यासाठी नियंत्रण रेषेपासून सध्या या विमानांना लांब ठेवण्यात आले आहे. लडाख सेक्टरमध्ये प्रशिक्षणासाठी राफेल विमानांचा वापर करता येऊ शकतो असे हवाई तज्ज्ञांचे मत आहे. युद्धाच्या प्रसंगात सिग्नल फ्रिक्वेन्सी बदलण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे.
चीनच्या “पीपल्स लिबरेशन आर्मी’ने अक्साई चीनमध्ये डोंगरात उंचावर सिग्नल पकडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स रडार बसवले आहेत. पण युद्धाच्या प्रसंगात राफेलचे सिग्नेचर दुसरे असतील. “पीएलए’चे एअर क्राफ्ट शोधण्यासाठी बनवलेले रडार चांगले आहेत. कारण त्यांनी अमेरिकन एअर फोर्सला लक्षात ठेऊन ही रडार बनवली आहेत असे तज्ज्ञांनी सांगितले.
राफेलमधली शस्त्रांमुळे ही विमाने सर्वाधिक घातक बनवली आहेत. या लढाऊ विमानामध्ये हवेतून हवेत मारा करणारी मिटिओर, हवेतून जमिनीवरच्या लक्ष्याचा वेध घेणारी स्काल्प मिसाइल्स आहेत. मिटिओरची रेंज 150 किमी तर स्काल्पची रेंज 300 किमी आहे. त्यामुळे राफेल शत्रूसाठी निश्चित कर्दनकाळ ठरेल.