पुणे – एअरफोर्सच्या माजी अधिकाऱ्याला “हनी ट्रॅप”मध्ये अडकवत 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. त्याला मारहाण करून तीन लाखांचा धनादेश घेण्यात आला. याप्रकरणी चौघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली.
दत्तात्रय यादव (47), उत्तम तानाजी कुऱ्हाडे (40, दोघे रा. आळे, ता. जुन्नर), अनिल ज्योतिराम वाल्मीकी (45, रा. कात्रज), नारायण सोन्याबापू जाधव (38, रा. जुन्नर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी होणाजी गुंजाळ (59, रा. चंदननगर) यांना आरती नावाच्या महिलेने फोन करून नोकरीबाबत विचारणा केली होती. यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना 16 ऑगस्ट रोजी नारायणगाव येथे बोलावून घेतले होते. तेथून दोन किलोमीटर आत एका घरात नेण्यात आले. तेथे आरतीने तीच्या चार साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर चौघांनी “तू आरतीसोबत शरीरसंबंध ठेवले’ असा जाब विचारत कुऱ्हाड घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली. यातून सुटायचे असल्यास 50 लाखांची मागणी केली. यानंतर तडजोडीनंतर विमाननगर येथे येऊन प्रत्येकी 10 लाख रुपयांचे तीन धनादेश घेतले. बॅंकेतून पैसे काढून घेईपर्यंत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. फिर्यादी तक्रार दाखल केल्यावर विमानतळ पोलिसांना दोघे हॉटेलमध्ये सापडले.
आरोपी अनिल वाल्मीकीचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. नारायण जाधव हा शेळ्यांचा व्यापारी आहे, तर यातील एकाचा पूर्वी डान्सबार होता. त्यांनी अशाप्रकारे अनेक गुन्हे केल्याची शक्यता आहे. -भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक