मोबाइलवर डाटा राहिल्याने घटना उघडकीस : पोलीस ठाण्यात गुन्हा
लोणी काळभोर – नात्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून जबरदस्तीने मद्य पाजून दि. 19 फेब्रुवारी ते 19 मे या कालावधीत तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून व अनैसर्गीक कृत्य केले. तसेच ही बाब कोणासही न सांगण्याबद्दल धमकी देणाऱ्या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नात्यातीलच मुलीवर बलात्कार करून नात्याला काळीमा फासण्याची घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षे वयाच्या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यांचे नातेवाईकांमध्ये आपापसांत वाद असल्याने ते एकमेकांशी बोलत नाहीत. या तरुणाने डिसेंबर 2018 तिला इन्स्टाग्राम सोशल वेबसाईटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. नात्यातील तरुणाची असल्याने तिने ती स्वीकारली. मोबाईल नंबर दिला. त्यानंतर ते दोघे व्हॉटसऍपवरून संदेशाची देवाणघेवाण करू लागले. एके दिवशी आपण ड्रिंक घ्यायला जायचे का, असा संदेश पाठवला. तिला तो न आवडल्याने तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. दरम्यानच्या काळात वसतिगृहातील मैत्रिणीशी बिनसल्याने तिला नैराश्य आले. ही बाब तिने तरुणाला सांगितली.
त्यानंतर तो तिला यापुढे आपण नातेवाईकांसारखे न रहाता मित्र-मैत्रीणीसारखे राहू, असा धीर दिला. वेळोवेळी धीर देत असल्याने तो तिला आवडत होता. त्यामुळे ही बाब तिने कोणास सांगितली नाही. दि. 17 फेब्रुवारीला त्याने हॉटेलमध्ये आरक्षित खोलीत नेले. सिगारेट ओढून मद्यपान केले. ती नकार देत असताना त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कॉलेज आवारात मुलांशी बोलली तर तिच्यावर ओरडत होता. माझ्याकडे पिस्तूल आहे, असे सांगितल्याने ती त्याला घाबरून होती.
आठ दिवसांनी परत त्याच हॉटेलमध्ये पुनरावृत्ती झाली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्याने तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये नेले. तेथे 2 ते 3 वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 16 मे रोजी त्याने पुन्हा तिला त्याच हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हातपाय बांधून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. (दि.24) मे कॉलेजला सुट्टी असल्याने ती घरी गेली. त्यावेळी वडीलांनी तिला नवीन मोबाइल घेऊन दिला. जुन्या मोबाइलमधील डाटा नवीन मोबाइलमध्ये घेतला. परंतू अनावधानाने त्याने पाठवलेले संदेश राहिले. ते वडीलांनी पाहिल्यानंतर तिने सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. (दि. 3) जून तिच्या मैत्रीणीव्दारे मला फोन केला नाही तर तिच्या कुटुंबीयांना धोका पोहचवेन, अशी धमकी तरूणाने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.