शिरूर – डोक्याला पिस्तूल लावून पतीसह खलास करण्याची धमकी देऊन मजूर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदे तालुक्यातील साखर कारखाना संचालक व शिरूर तालुक्यातील बडा नेता याच्याविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
श्रीनिवास बाबूराव घाटगे (रा. इनामगाव, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा संचालक असलेला घाडगे हा शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बडा पदाधिकारी आहे. बलात्कार झालेल्या मजूर महिलेने अत्याचाराविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली होती. त्यांच्या आदेशावरून शिरूर पोलिसांनी घाटगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला. (दि.13) इनामगाव येथील जिल्हा परिषद शाळेनजीकच्या एका बांधकामावर हा प्रकार घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला, जिल्हा परिषद शाळेजवळील एका पडक्या खोलीत वीटा उचलत असताना घाटगे तेथे आला. तेथे त्याने पिस्तूलचा धाक दाखवून अत्याचार केला. मदतीसाठी आरडाओरडा करू पाहणाऱ्या महिलेच्या डोक्याला पुन्हा पिस्तूल लावली. थोड्या वेळाने संबंधित महिलेची जाऊ तेथे आली. घाटगे याने तिलाही पिस्तुलाचा धाक दाखवून याबाबत वाच्यता केल्यास तुम्हाला गावातून हाकलून देईन, दोघींना तुमच्या नवऱ्यांसह मारून टाकीन, अशी धमकी दिली.
गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. गुन्हा दाखल होताच घाटगे फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करीत आहेत.