शिरूर – शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील दहा वर्षीय मुलीस तुला खाऊ देतो असे आमिष देऊन तिचे अपहरण करून तिच्यावर कोळगाव डोळस येथे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रशेखर दिलीप वनशीव (वय 32, रा. गणपती माळ, वडगाव रासाई, ता. शिरूर) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. चंद्रशेखर वनशीव याने मुलीला खाऊचे आमिष दाखवत तिच्या घरापासून स्कुटीवर बसवून तिला वडगाव रासाई, पारगाव व कोळगाव डोळस या ठिकाणी घेऊन गेला.
शेवटी कोळगाव डोळस येथे एका छपरामध्ये अल्पवयीन मुलीला रात्रभर ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा तिला तिच्या घरी आणून सोडले. पिडीत मुलीने आपल्या घरच्यांना सर्व हकीकत सांगितली. मुलीच्या घरच्यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.