हत्येपेक्षा बलात्काराचा गुन्हा मोठा नाही ; आरोपींचा हायकोर्टात दावा

शक्ती मिल बलात्कार प्रकरण

मुंबई: बलात्काराचा गुन्हा हा हत्येपेक्षा मोठा नाही. हत्येच्या गुन्ह्याप्रमाणे बलात्कारच्या गुन्ह्यातही फाशीची शिक्षा ठोठावणे आरोपींच्या मुलभूत हक्कांवरच गदा आहे, असा युक्तीवाद शक्ती मिल कंपाऊंड बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वतीने ऍड. युग चौधरी यांनी उच्च न्यायालयात केला.

मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी एका छायाचित्रकार महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तिघा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा ठोठावताना न्यायालयाने केंद्र सरकारने कलम 376(ई) या कायद्यात दुरुस्ती करून आरोपीने दोनवेळा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला जन्मठेपेची अथवा फाशी शिक्षा ठोठावण्याच्या तरतुदीची अंमलबजावणी केली. त्या विरोधात विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांनी केंद्र सरकारने कलम 376(ई) मध्ये केलेल्या दुरूस्तीलाच आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती भुषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी आरोपींच्या वतीने ऍड. युग चौधरी यांनी युक्तीवादाला सुरूवात करताना आरोपींना हत्येचा गुन्ह्यातील फाशीची शिक्षा ठोठावणे म्हणजे आरोपींच्या जगण्याच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे. तसेच शिक्षेची अंमलबजावणी झाल्यास आरोपींना सुधारण्याची संधी न दिल्यासारखे होईल, असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने खंडपीठाने याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

Leave A Reply

Your email address will not be published.