बलात्कार झालाच नाही; पैशांसाठी केला बनाव

बारामती न्यायालयाने दिला कायदेशीर कारवाईचा आदेश

बारामती (प्रतिनिधी) – पतीने हातउसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून माझ्यावर आरोपीने वारंवार बलात्कार केला, अशी फिर्याद देणाऱ्या महिलेने गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच बलात्कार झाला नाही. फक्‍त पैशाचा तगादा होता, असे नवे प्रतिज्ञापत्र लिहून दिले. त्यावर न्यायालयाने आरोपीला जामीन दिला; मात्र महिलेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

वालचंदनगर पोलीस ठाण्यात लाकडी गावानजीकच्या एका महिलेने आपल्यावर वारंवार बलात्कार झाल्याची फिर्याद दिली होती. 6 जून रोजी पती घरी नसताना आरोपीने पैसे दे, नाही तर शरीरसंबंध ठेव असे सांगत बलात्कार केला, अशी फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. त्याचवेळी संशयित आरोपीने बारामती सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यादरम्यान संबंधित महिलेने वालचंदनगर पोलिसांना पुन्हा नव्याने प्रतिज्ञापत्र देत आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगत वारंवार पैशाचा तगादा होत असल्याने बलात्काराची फिर्याद दिल्याचे प्रतिज्ञापत्र घेतले. त्यानंतर या गुन्ह्याने वेगळे वळण घेतले.

बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांच्यासमवेत या जामिनाची सुनावणी सुरू असताना सरकारी वकील ऍड. प्रसन्न जोशी यांनी संबंधित फिर्यादी महिलेचे मूळ जबाब व नवे प्रतिज्ञापत्र मांडून विसंगती न्यायालयासमोर आणली. संबंधित महिलेने खोटा गुन्हा दाखल करून पोलीस यंत्रणा व न्याय यंत्रणेचा वेळ व पैसा खर्च केल्याचा दावा केला.

त्यावर दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीशांनी सरकारी वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरुन या घटनेत फिर्यादी महिलेने न्याययंत्रणा व पोलीस यंत्रणेचा वेळ खर्ची घातला व आरोपीला न्यायासाठी झगडावे लागल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला. संबंधित महिलेवर कायदेशीर कारवाईचे आदेश वालचंदनगर पोलिसांना दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.