नवी दिल्ली – कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे खासगी सचिव पीपी माधवन यांच्यावरील बलात्कार प्रकरणी ट्रायल कोर्टाच्या कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. आरोपपत्राला आव्हान देणाऱ्या माधवनच्या याचिकेवर कोर्टाने पीडितेला तिची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला.
न्या. दिनेश कुमार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान, फिर्यादी आणि पीडितेच्या बाजूने उपस्थित असलेल्या अधिवक्ता ममता राणी यांनी सांगितले की, सर्व तथ्ये आणि पुराव्यांच्या आधारे ट्रायल कोर्टाने 14, 22 सप्टेंबर रोजी आरोपी माधवनवर आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्या अशिलाकडे सर्व पुरावे आहेत आणि त्यांना आव्हान याचिकेवर त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात यावा.
त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने वेळ देत 25 एप्रिल रोजी सुनावणी निश्चित केली. अधिवक्ता ममता राणी यांनी आक्षेप घेतला की सुनावणीला स्थगिती देण्याचे कोणतेही कारण नाही आणि असे केल्याने खटल्याच्या सुनावणीला विनाकारण विलंब होईल.