पुणे – पोलीस वसाहतीत एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन पोलीस निरीक्षकाने बलात्कार केला.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबत पीडित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक माने यांची सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नेमणूक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने पुण्यात नेमणुकीस होते. त्यावेळी त्यांची पीडित महिलेबरोबर ओळख झाली. त्यांनी महिलेला भवानी पेठेतील पोलीस वसाहतीतील घर दाखविण्यास नेले. तेथे महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर बलात्कार केला.
माने यांनी या प्रकाराचे मोबाइल चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. शिवाय, पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. महिलेने अखेर समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. समर्थ पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.