रोहतक (हरियाणा) – डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमला शनिवारी 40 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले आहे. बलात्कार आणि हत्येप्रकरणी राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याच्या पॅरोलसाठीची कागदपत्रे पूर्ण होऊन शनिवारी त्याची सुटका करण्यात आली.
डेरा प्रमुखाच्या कुटुंबीयांनी तुरुंग प्रशासनाकडे राम रहीमच्या वतीने महिनाभराचा पॅरोल मिळावा यासाठी अर्ज केला होता. हरियाणा सरकारने हा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवला. विभागीय आयुक्तांनी यावर निर्णय घेत राम रहिमला 40 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली. ही रजा मिळाल्यानंतर राम रहिम हे डेरा सच्चाचे माजी प्रमुख शाह सतनाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम 25 जानेवारीला होणार आहे.
दरम्यान, गतवर्षी 14 ऑक्टोबरला राम रहिमला 40 दिवसांची पॅरोल मंजूर झाली होती. या रजेचा कालावधी संपल्यानंतर 25 नोव्हेंबर 2022 रोजी राम रहिम पुन्हा कारागृहात परतला होता. हरियाणातील पंचायत आणि आदमपूर विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी राम रहीमला पॅरोलची रजा मंजूर झाली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक ही रजा मंजूर केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता.