घनदाट जंगल… आसपास हिंस्त्र जंगली प्राण्यांचा वावर… जंगलात केवळ दोन तरुण… मदतीसाठी शेकाडो किलोमीटर कोणीही नाही… हे वर्णन आहे रणवीर सिंगच्या आगामी रणवीर वर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स या इंटरॅक्टिव्ह एडवेंचरवर आधारित शोचे! कोणतेही पात्र साकारताना जीवतोड मेहनत घेणारा रणवीरने या एडवेंचर शोमध्ये तर आपला जीव पणाला लावल्याचं दिसतंय. नुकताच या शोचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीलाच रणवीर भीतीने धापा टाकताना दिसतोय. पुढील दृश्यामध्ये एक भलं मोठं अस्वल त्याचा पाठलाग करताना दाखवण्यात आलं आहे. त्याचवेळी, इंटरएक्टिव्ह स्पेशलमध्ये प्रेक्षकांना रणवीरसाठी काही ना काही निर्णय घेण्याची संधी मिळेल, असेही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. एका क्लिपमध्ये रणवीर मेल्याचे नाटक करत असून एक अस्वल त्याला हुंगत असल्याचं दाखवलंय. रणवीर आपल्या चाहत्यांना बटण दाबा आणि मला वाचवा अशी हात जोडून विनवणी करत आहे. टिझरमध्ये रणवीर बेअर ग्रिल्सच्या पाठोपाठ झिपलाइन वापरतानाही दाखवण्यात आले आहे.
नेटफ्लिक्सच्या स्पेशल इंटरॅक्टिव्ह एडवेंचरवर आधारित असलेल्या य्याला सीरिजमधून रणवीर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. बेअर ग्रिल्ससोबत शोच्या शूटिंगसाठी तो जुलै २०२१ मध्ये सर्बियाला गेला होता. रणवीरचा जयेशभाई जोरदार नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून सर्कस और रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.