मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भारताचा पहिला सुपर हिरो ‘शक्तिमान’ मोठ्या पडद्यावर येणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. यासाठी रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे देखील समोर आले होते. आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती कंपनी सोनी पिक्चर्सच्या या मेगा बजेट चित्रपटासाठी रणवीर सिंगचे नाव अंतिम असून चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नावही निर्मिती कंपनीने निश्चित केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मात्र अद्याप कंपनी करत नसल्याचे समजते.
सोनीने फार पूर्वीच त्याचे एक निर्माते मुकेश खन्ना यांच्यासोबत शक्तीमान या दूरदर्शनच्या सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक चित्रपट हक्क करार केला आहे. खुद्द मुकेश खन्ना यांनीही या व्यक्तिरेखेवर तीन चित्रपट बनवण्यासाठी सोनी पिक्चर्ससोबत करार केल्याचे सांगितले आहे.त्यामुळे आता या चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
रणवीर सिंगसोबत ‘शक्तिमान’ हा चित्रपट बनवण्यासाठी सोनी पिक्चर्समध्ये तयारी सुरू केल्याचे आता समोर आले आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाणार असल्याचे समजते. शक्तिमान हा ९० च्या दशकातील सुपर हिरो असला तरीही आजच्या काळानुसार त्यामध्ये बदल देखील केले जाणार आहेत.