रणवीर सिंह नेहमीच हटके रोल करण्यामध्ये रस दाखवतो. त्याला स्क्रीप्टही तशीच इंटरेस्टींग आणि त्याचा रोलही हटके हवा असतो. याशिवाय तो आपल्या रोलचा एवढा अभ्यास करतो की पुढचे काही महिने तो ही व्यक्तिरेखाच जगत असतो. “गली बॉय’ आणि “पद्मावत’मधील त्याचे काम बघितल्यावर हे सहज लक्षात येऊ शकते.
आता रणवीर सिंह भारतीय सुपरहिरोचा रोल करणार आहे. कॉमिक्समध्ये नागराज नावाचे हे पात्र लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झालेले आहे. या नागराजच्या धाडसी आणि अचाट साहसाच्या कथांवर करण जोहर एक सिनेमा बनवण्याचा विचार करतो आहे.
करण आणि रणवीरमध्ये या संदर्भात चर्चाही सुरू झाली आहे. नागराज या पात्राला घेऊन 80 आणि 90 च्या दशकामध्ये कॉमिक्समध्ये शेकडो चित्रकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. आता त्या कथांवर पहिला सिनेमा करण्याची तयारी सुरू होते आहे. हा फॅन्टॅसी प्रधान ऍक्शनहिरोचा पहिला सिनेमा 2022 मध्ये रिलीज होईल.
भारतीय सिनेमातील पहिला सुपरहिरो म्हणून हृतिकचा “क्रिश’ गाजला. त्याचे दोन भागही होऊन गेले. त्यानंतर “फ्लायिंग सिख’पण झाला. पण तो आपटला. आता रणवीर सिंहच्या निमित्ताने नागराज प्रेक्षकांसमोर येतो आहे.