पुण्याचा रणवीर मोहिते ठरला फलटण चषकाचा मानकरी

राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्‍यपद

फलटण – मुधोजी कॉलेज बहुउद्देशीय सांस्कृतिक हॉल, फलटण शहर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने आणि कोहिनूर चेस क्‍लब, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जलदगती बुद्धीबळ स्पर्धेचे अजिंक्‍यपद पटकावत पुण्याचा रणवीर मोहिते फलटण चषकाचा मानकरी ठरला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत जामखेड, मुंबई, श्रीरामपुर, जेजुरी, सासवड, वाई, निरा, सातारा, पुणे, बारामती, अहमदनगर, फलटण, सुपे, लोणंद येथून एकूण 154 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये वयवर्ष 6 ते 70 वर्षापर्यंतच्या खेळाडुंसह 44 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ प.पू.गोविंद महाराज उपळेकर समाधी ट्रस्टच्या सचिव सुभद्राराजेताई नाईक निंबाळकर, मुधोजी कॉलेज प्राचार्य अरुण गायकवाड, उपप्राचार्य सुरेश ठोंबरे, महाराष्ट्र राज्य हॉकी क्रीडा मार्गदर्शक महेश खुंटाळे आणि स्पर्धा संयोजक कोहिनूर चेस क्‍लब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय फिडे बुद्धिबळ पंच प्रणव टंगसाळे, राज्य पंच सौ. मनिषा जाधव, उद्धव पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कोहिनूर चेस क्‍लबच्या सुरज ढेंबरे, सुरज फडतरे, अक्षय पिसाळ, सुजित जाधव, वैभव मार्कर, प्रदीप वाघमोडे, मयुर शिंदे, विनायक गोडसे, प्रशांत फडतरे या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच थ्री टू वन चेस ऍकॅडमी यांचे विशेष सहकार्य मिळाले. तायप्पा शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुरज फडतरे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.