रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी यांची हिट जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धम्माल करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपट निर्माता रोहित शेट्टी हा 1982मध्ये प्रदर्शित झालेल्या “अंगूर’ या क्लासिक कॉमेडी चित्रपटाचा रिमेक साकारणार आहे. या चित्रपटात रणवीरसोबत आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस झळकणार असल्याचे समजते. रोहित शेट्टीने रणवीर सिंहच्या अपोझिट जॅकलीन फर्नांडिसला घेण्याचा प्लॅन केला आहे.
मात्र, याबाबत अद्याप कोणाकडून पुष्टी देण्यात आलेली नाही; परंतु रोहित हा सध्या स्क्रिप्टला मॉडर्न टच देण्याचे काम करत आहे. ज्याप्रमाणे त्याने “गोलमाल’ला “बोल बच्चन’मध्ये बदलले होते. रोहित शेट्टी हा 2015 पासून “अंगूर’ चित्रपटाच्या रिमेक साकारण्याची तयारी करत आहे. रोहित सुरुवातीला हा चित्रपट शाहरुख खानसोबत साकारू इच्छित होता, पण तसे होऊ शकले नाही आणि त्यानंतर दोघांनी “दिलवाले’ हा चित्रपट साकारला.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात रोहितने या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर खूप मेहनत घेतली आहे. रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह हे दोघेही या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटात रणवीर डबल रोल साकारताना दिसणार आहे. रणवीर हा पहिल्यांदाच डबल रोलची भूमिका साकारत आहे.