रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये

मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सोलापूर – राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज असणारे रणजितसिंह मोहिते-पाटील आणि त्यांच्या गटाच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. अकलूज येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवार दि. 20 रोजी दुपारी साडेबारा वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील गरवारे हॉल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रणजीतसिंहांचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी केल्याने डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला पश्‍चिम महाराष्ट्रात जबर धक्का बसला आहे.

या र्बैठकीत बोलताना रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचे गुणगाण केले. आपण विकासासाठी कटिबद्ध असून त्यासाठीच भाजप प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजप प्रवेश करणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्याला पाठिंबा दर्शविला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

राष्ट्रवादीवर नाराज आणि भाजपच्या उंबरठ्यावर असलेल्या मोहिते पाटील गटाची महत्वाची बैठक अकलूज येथील शिवरत्न बंगल्याच्या आवारात झाली. या बैठकीला हजारो कार्यर्त्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार आहेत. माढा येथून शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार असं सुरुवातीला जाहीर करण्यात आलं होतं. मात्र तिथून त्यांनी माघार घेतली. आता त्याच ठिकाणी भाजपा रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिकिट देऊ शकते अशी शक्‍यता आहे.

या बैठकीला खा. विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह करमाळाचे शिवसेना आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, माळशिरस तालुक्‍यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती वैष्णविदेवी मोहिते पाटील, सांगोला, करमाळा, माढा, पंढरपूर, मोहोळ तालुक्‍यातील पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो समर्थक उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात माघार घेतल्यानंतरही माढाच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. भाजपचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशाला दुजोरा दिला आहे. तसेच आणखी काही मोठे नेते संपर्कात असल्याचं गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये सांगितले. डॉ. सुजय विखे यांच्या प्रवेशानंतर आणखी बरेच जण लाईनमध्ये असल्याचे विधान गिरीश महाजन यांनी केले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.