#RanjiTrophy : सेनादलाचा महाराष्ट्रावर एक डाव आणि ९४ धावांनी विजय

नवी दिल्ली : दिवेश पठाणिया आणि सचिदानंद पांडे यांच्या पाच-पाच बळीच्या जोरावर सेनादलाने रविवारी रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत ग्रुप सी मधील सामन्यात तिस-या दिवशी महाराष्ट्रावर एक डाव ९४ धावांनी विजय मिळवला आहे. सेनादलाचा हा ग्रुप सी मधील दुसरा विजय आहे. या विजयासह सेनादलाने आपल्या खात्यात आणखी ७ गुण जमा केले आहेत. सचिदानंद पांडे सामन्याचा मानकरी ठरला.

महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात केवळ ४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सेनादलाने पहिल्या डावात सर्वबाद २८५ धावा करत २४१ धावांची आघाडी घेतली होती. सेनादलाकडून पहिल्या डावात रवी चौहानने सर्वाधिक ६५ तर विकास हाथवाला आणि एपी शर्माने प्रत्येकी ४७ धावा केल्या. महाराष्ट्राकडून गोलंदाजीत मनोज इंगळेने (७३/५) तर संकलेचा (७८/२), सत्यजित बच्छावने (१८/२) गडी बाद केले.

त्यानंतर महाराष्ट्राने दुस-या डावात दुस-या दिवसअखेर ५ बाद ९३ धावा केल्या होत्या. आज तिस-या दिवशी पुढे खेळताना महाराष्ट्राने १ धाव काढल्यानंतर नौशाद शेख(४१)ची विकेट गमावली. पांडेने यष्टीरक्षक नकुल वर्माकरवी नौशादला झेलबाद केलं. सलामी फलंदाज मुर्तजा ट्रंकवाला शनिवारी रिटायर्ड हर्ट झाला होता. त्यानंतर आज ट्रंकवाला मैदानावर उतरला पण मोठी खेळी करू शकला नाही. दोन चौकार लगावल्यानंतर ९ धावांवर ट्रंकवाला बाद झाला.

दुस-या दिवसअखेर ३३ धावांवर फलंदाजी करत असलेला विशांत मोरेसुध्दा ३ धावांची भर टाकत पांडेच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. तळाच्या फलंदाजांनी थोडाफार संघर्ष करण्याचा प्रयत्न केला पण सेनादलाच्या गोलंदाजासमोर त्यांचा निभाव लागला नाही आणि महाराष्ट्राचा दुसरा डाव ४८.१ षटकांत १४७ वर संपुष्टात आला. अशाप्रकारे सेनादलाने ग्रुप सी मध्ये दुसरा विजय मिळवत आपल्या खात्यात ७ गुण जमा केले.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : पहिला डाव : ३०.२ षटकांत सर्वबाद ४४ (सत्यजित बच्छाव ११, चिराग खुराणा १४,पठाणिया १३-२, पांडे १८-३, पूनम पूनिया ११-५) आणि दुसरा डाव : महाराष्ट्र : ४८.१ षटकांत सर्वबाद १४७( नौशाद शेख ४१, विशांत मोरे ३६, सचिदानंद पांडे ५६-५, दिवेश पठाणिया ४९-५).

सेनादल : पहिला डाव : ९५.२ षटकांत सर्वबाद २८५( रवी चौहान ६५, विकास हाथवाला ४७, ए.पी. शर्मा ४७, मनोज इंगळे ७३-५, सत्यजित बच्छाव १८-२, संकलेचा ७८-२, चौधरी ६२-१)

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.