#RanjiTrophy : महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद अंकित बावणेकडे

पुणे : रणजी चषक स्पर्धेत आगामी झारंखडविरूध्दच्या लढतीसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद अंकित बावणेकडे सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्र संघाची पुढील लढत ११ जानेवारीपासून झारखंडविरूध्द नागोठाणे येथे खेळली जाणार आहे.

या मोसमात महाराष्ट्राचे कर्णधारपद नैशाद शेखकडे सोपविण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्राची स्पर्धेतील कामगिरी पाहता त्याच्याकडील सूत्रे काढून घेत अंकित बावणेवर विश्वास दाखविला आहे. तर रूतूराज गायकवाड, मुर्तझा ट्रंकवाला या सलामीवीर जोडीला विश्रांती देण्यात आली असून राहुला त्रिपाठी, चिराग खुराणा, संकलेचा यांना बाहेर बसविण्यात आले आहे. महाराष्ट्राने झारखंडविरूध्द सामन्यात नवोदित खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील चार लढतीत महाराष्ट्राला एकही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे स्पर्धेतील महाराष्ट्राचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. महाराष्ट्र संघ हा सध्या ‘क’ गटात नवव्या स्थानावर आहे.

दरम्यान, या स्पर्धेत महाराष्ट्राला हरियाणा आणि सेनादलाकडून डावाने पराभव स्विकारावा लागला आहे तर जम्मू-काश्मीरने महाराष्ट्राला ५४ धावांनी पराभूत केले होते. तर छत्तीसगडविरूध्द सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावातील आघाडीमुळे महाराष्ट्राला ३ गुण मिळाले होते.

महाराष्ट्र संघ : अंकित बावणे ( कर्णधार), स्वप्नील गुगळे, जय पांडे, नौशाद शेख, यश क्षीरसागर, अथर्व काळे, सत्यजित बच्छाव, विशांत मोरे, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, अझीम काझी, प्रदीप दाढे, शामशुझमा काझी, जगदीश झोपे, आशय पालकर.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.