बारामतीत सुळे यांच्याविरोधात रंजनाताई कुल

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आज अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडूनही रंजनाताई कुल यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे. बारामती मतदार संघात सुळे आणि कुल अशी लढत होणार असल्याचे संकेत मिळत असून कुल यांना सर्वपातळींवर मोठी रसद पुरवण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यातून 48 जागांपैकी अधिकाधिक खासदार निवडून आणण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी मातब्बरांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी देण्यापूर्वी सर्व पातळींवर चाचपणी केल्यानंतरच नावे जाहीर केली जात आहेत. यानुसार आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये 12 मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी दि.23 एप्रिलला मतदान होत असल्याने राष्ट्रवादीकडून पहिल्याच यादीत सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाकडूनही बारामती मतदार संघाबाबत निर्णय घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेल्या दोन-चार दिवसांपासून मुंबईत बैठकांवर बैठका घेतल्या गेल्या. सुळे यांच्या विरोधात लढणारा उमेदवार सर्वांगिण बाबींवर तगडा असावा, हे सुत्र आजमावून पाहताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारामती शहरासह मतदार संघातील अनेकांशी चर्चा केल्यानंतर काही नावांवर शिक्का मोर्तब केले होते. यामध्ये अखेर दौंड तालुक्‍याच्या माजी आमदार रंजनाताई कुल यांच्या नावाला सर्वानुमते सहमती दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपकडून बारामती मतदारसंघात रंजनाताई कुल याच उमेदवार असू शकतील.

दौंड तालुक्‍याच्या माजी आमदार असलेल्या रंजनाताई कुल या आमदार राहुल कुल यांच्या मातोश्री आहेत. राहुल कुल यांचे वडील स्व. सुभाषअण्णा कुल हे सुद्धा दौंडचे आमदार होते. त्यातच राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कांचनताई कुल या बारामती तालुक्‍यातील वडगाव निंबाळकर येथील राजकीय घराण्याशी संबंधीत आहेत. बारामती मतदार संघातील प्रत्येक तालुक्‍यात कुल कुटुंबीयांचे नातेसंबंध असल्याने रंजनाताई कुल या सुप्रिया सुळे यांच्यापुढे आव्हान उभे करू शकतील.

याशिवाय आमदारकीच्या काळात रंजनाताई यांनी दौंड तालुक्‍यातील सर्वच पातळींवरील प्रश्‍न यशस्वीरित्या सोडविले आहेत. 2009च्या विधानसभेवेळी बारामतीतील दुष्काळी 22 गावे दौंड मतदार संघाला जोडलेली गेली होती, त्यामुळे त्यांचा संपर्क या गावांतही चांगला आहे. त्यांचे चिरंजीव असलेले विद्यमान आमदार राहुल कुल यांनीही तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे असले तरी आमदार राहुल कुल यांची मुख्यमंत्री फडणवीस तसेच भाजपतील वरीष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. याच माध्यमातून राहुल कुल यांनी तालुक्‍यात कोट्यवधींचा निधी आणला आहे. यासह बारामती मतदार संघात येणाऱ्या तालुक्‍यातील असंख्य कुटुंबियांना आरोग्य सेवेशी निगडीत सहकार्य आमदारांनी केल्याने कुल यांचा परिचय वाढलेला आहे. बारामती तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्‍नांकरिताही आमदार कुल यांनी बाजु लावून धरली होती. याशिवाय माजी आमदार असल्याने रंजनाताई कुल यांना मानणारा मोठा वर्ग दौंड तालुक्‍यात आहे. याच कारणास्तव भाजपकडून बारामती लोकसभा मतदार संघातून रंजनाताई कुल यांना उमेदवारी अंतिम समजली जात आहे.

मंत्री महादेव जानकरांचे पाठबळ
बारामती मतदार संघात 2014 मध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. तेच जानकर आता रासपचे एकमेव आमदार असलेले राहुल कुल यांच्या मातोश्री रंजनाताई कुल यांना पाठबळ देणार आहेत. बारामती मतदार संघात मंत्री जानकर यांच्या बाजुने मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे महादेव जानकर यांच्याकडून कुल यांना मिळणारी मदत निर्णायक ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)