चंदीगड – डेरा सच्चा सौदा पंथाचा प्रमुख गुरमीत राम रहिम आणि त्याच्या चार साथीदारांना येथील सीबीआय विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 19 वर्षापुर्वीच्या एका खून प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पंचकुला येथील कोर्टाने बाबा राम रहिम, तसेच कृष्णलाल, जसबीरसिंग, अवतार सिंग, सबडील या चौघांना 8 ऑक्टोबर रोजीच दोषी ठरवले होते. त्यांची शिक्षा आज जाहीर करण्यात आली.
डेराचे व्यवस्थापक रणजीतसिंग यांची 10 जुलै 2002 रोजी हरियानातील कोलियां गावात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रणजीतसिंग हेही डेरा सच्चा सौदाचे अनुयायी होते. तथापि त्यांनी डेराच्या मुख्यालयात महिलांवर कसे लैंगिक अत्याचार केले जातात याची माहिती निनावी पत्राद्वारे अन्यत्र कळवली होती असे त्यांच्यावर आरोपींचा संशय होता.
त्यातूनच ही हत्या केली गेली. गुरमीत राम रहिम याला या आधीच दोन अल्पवयीन शिष्यांवर बलात्कार केल्याच्या कारणावरून 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.