रणजीत सरफराजचे विक्रमी त्रिशतक

मुंबई – रणजी स्पर्धेत मुंबईच्या सरफराज खान याने त्रिशतक ठोकत आज विक्रमी खेळी केली. उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना सरफराजने प्रथम शतकी, त्यानंतर त्याचे रुपांतर द्विशतकात केले आणि मग प्रथम श्रेणी सामन्यातील पहिले त्रिशतक पूर्ण केले. सरफराजची कारकिर्दीतील ही सर्वोच्च खेळी ठरली आहे. तो 301 धावांवर नाबाद राहिला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात सरफराज खान याने 391 चेंडूत त्रिशतक केले. सरफराजच्या या खेळीत 30 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या त्रिशतकाच्या खेळीत स्ट्राइकरेट 76 इतका राहिला. मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक करणारा तो आठवा फलंदाज ठरला आहे. मुंबईकडून 2009 नंतर प्रथमच एखाद्या फलंदाजाने 300हून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी रोहित शर्माने 309 धावांची खेळी केली होती.

22 वर्षीय सरफराज खान 294 धावांवर खेळत असताना षटकार खेचत आपले त्रिशतक पूर्ण केले. सरफराजची ही खेळी पाहून सर्वांना भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याची आठवण झाली. सेहवाहने त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा 200 आणि 300 धावांचा पल्ला षटकार मारून पार केलेला आहे. सेहवागने 250वी धाव देखील षटकार मारूनच पूर्ण केली होती.

दरम्यान, मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश याच्यातील हा सामना अनिर्णित राहिला. उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 8 बाद 625 धावांवर डाव घोषित केला होता. उत्तरादाखल मुंबईने 7 बाद 688 धावा केल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.