कोलकाता : सर्वाधिक रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईने यावर्षी देखील उत्तम कामगिरी करत रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबईने क्वार्टर फायनलमध्ये हरियाणाला धूळ चारत दिमाखात सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबईने हरियाणाचा 152 रनने पराभव केला आहे. मुंबईच्या या विजयात शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, कर्णधार अजिंक्य रहाणे, तनुष कोटियन यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईने 315 रन केले. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईची अवस्था 113 वर 7 विकेट अशी झाली होती, पण नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या तुनष कोटियनने 97 रन तर सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शम्स मुलानीने 91 रन केले. मुंबईचा ऑलआऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या हरियाणाने 301 रन केले, ज्यामुळे मुंबईला पहिल्या इनिंगमध्ये 14 रनची आघाडी मिळाली.
हरियाणाचा कर्णधार अंकित कुमारने 136 रन केले. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने 6 विकेट घेतल्या, तर शम्स मुलानी आणि तनुष कोटियनला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. हरियाणाचा ऑलआऊट झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आलेल्या मुंबईने 339 रनचा मोठा स्कोअर उभारला. कर्णधार अजिंक्य रहाणेने खणखणीत शतक झळकावलं. रहाणेने 180 बॉलमध्ये 108 रन केले, यात 13 फोरचा समावेश होता. याशिवाय सूर्यकुमार यादवनेही 70 रनची महत्त्वाची खेळी केली.
या सामन्यानंतर शार्दुल ठाकूरला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आले. मुंबईची सेमी फायनलची मॅच 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. क्वालिफायर 2 विरुद्ध क्वालिफायर 3 मधल्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल त्या संघाबरोबर मुंबईची सेमी फायनल मॅच होणार आहे.