Ranji Trophy (GOA vs ARP Day 1) : – वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) केलेली भेदक गोलंदाजी व त्यानंतर कश्यप बाकले (Kashyap Bakle) व स्नेहल कौठणकर (Snehal Kauthankar) यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर गोवा संघाने अरुणाचल प्रदेश संघाविरुद्धच्या रणजी लढतीत पहिल्याच दिवशी २ बाद ४१४ धावांपर्यंत मजल मारली.
पर्वरी येथील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अरुणाचल प्रदेश संघाचा डाव अर्जुन तेंडुलकरच्या भेदक गोलंदाजीसमोर ३०.३ षटकांत ८४ धावांवर मर्यादित राहिला. अर्जुन तेंडुलकरने रणजी स्पर्धेत प्रथमच ५ बळींची नोंद केली. अर्जुनने नीलम ओबी (२२) आणि चिन्मय पाटील (३), नबाम हाचांग (०), जय भावसार (०) व मोजी इटे (१) या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. त्याला मोहित रेडकरने १५ धावांच्या मोबदल्यात ३ तर कीथ मार्क पिंटोने ३१ धावांमध्ये २ गडी बाद करताना सुरेख साथ दिली. कर्णधार नबाम अबोने सर्वाधिक २५ धावा केल्या.
Stumps Day 1: Goa – 414/2 in 53.6 overs (Kashyap Bakle 179 off 156, Snehal Kauthankar 146 off 100) #GOAvARP #RanjiTrophy #Plate
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 13, 2024
गोवा संघाने पहिल्याच दिवशी धडाकेबाज फलंदाजी करताना ५४ षटकांत २ बाद ४१४ धावपर्यंत मजल मारली. ईशान गाडेकर केवळ ३ धावा काढून झटपट बाद झाला. त्यानंतर सुयश प्रभूदेसाई व कश्यप बाकले यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारी केली. सुयश प्रभूदेसाईने ६४ चेंडूत ६४ चेंडूत ११ चौकार व १ षटकार मारताना ७३ धावांची खेळी केली.
यानंतर कश्यप बाकले व स्नेहल कौठणकर यांनी अरुणाचलच्या गोलंदाजानावर जोरदार आक्रमण करताना आपापली शतके पूर्ण केली. दिवसअखेर कश्यप बाकलेने १५६ चेंडूत २४ चौकार व २ षटकार मारताना १७९ धावांवर तर स्नेहल कौठणकर १०० चेंडूत २१ चौकारासह १४६ धावांवर दिवसअखेर नाबाद राहिले. पहिल्याच दिवशी गोवा संघाकडे ३३० धावांची आघाडी आहे.