मुंबई – श्रेयस अय्यरने झळकावलेले द्विशतक व सिद्धेश लाडच्या नाबाद दीडशे धावांच्या जोरावर रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाने १२३.५ षटकांत ४ बाद ६०२ धावांवर आपला डाव घोषित केला. मुंबईच्या विशाल आव्हानांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर ओडिशा संघाची ५ बाद १४६ अशी अवस्था झाली.
Stumps Day 2: Odisha – 146/5 in 48.6 overs (Debabrata Pradhan 7 off 23, Sandeep Pattanaik 73 off 141) #MUMvODI #RanjiTrophy #Elite
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 7, 2024
कालच्या ३ बाद ३८५ पासून मुंबई संघाने दुसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. काल शतक झळकाविणारे सिद्धेश लाड (११६) व श्रेयस अय्यर (१५२) यांनी खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने श्रेयसचा धडाका पाहायला मिळाला. श्रेयसने १०१ चेंडूत शतक तर २०१ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. श्रेयसने या खेळीत तब्बल २४ चौकार व ९ षटकार लगावले.
श्रेयसचे हे रणजी स्पर्धेतील तिसरे द्विशतक असून त्याने हे द्विशतक ९ वर्षांनंतर झळकावले आहे. श्रेयस बाद झाल्यानंतर सिद्धेश लाडने सुर्यांश शेडगेच्या साथीने ६०० धावांचा टप्पा ओलांडला. कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव घोषित केला तेव्हा सिद्धेश लाड १६९ धावांवर तर सुर्यांश शेडगे ७९ धावांवर खेळत होते.
ओडिशा संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सात्विक सामल (०) बाद झाल्यानंतर अनुराग सारंगी व संदीप पटनाईक यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. मात्र सारंगी (३९) बाद झाल्यानंतर गोविंद पोदार (०), बिप्लब सामंतरे (०), व कार्तिक बिस्वास (२२) हे झटपट बाद झाल्याने २ बाद ११० वरून ओडिशाचा डाव ५ बाद १३७ असा घसरला. दुसरा दिवसअखेर संदीप पटनाईक ७३ तर देबब्रत प्रधान ७ धावांवर खेळत आहेत.