बाधित आढळल्याने रांजणी गाव बंद

मंचर-रांजणी (ता. आंबेगाव) गावात शुक्रवारी (दि. 17) 30 वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 117 वर पोहोचली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
ही व्यक्ती आठ दिवसांपूर्वी मुंबईवरून गावाला आलेली आहे. शुक्रवारी सकाळी त्या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रांजणी, कारफाटा, जाधववाडी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. तालुका व स्थानिक प्रशासनाने रांजणी गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. व्यक्ती राहते त्या वस्तीकडे जाणारे-येणारे रस्ते व रांजणी गाव बंद केले आहे. शुक्रवारी (दि. 17) सकाळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सरपंच भगवान वाघ, ग्रामसेवक एन. एस. डोके, गावकामगार तलाठी विशाल मुंगळे, आरोग्य कर्मचारी आदींनी परिसराची पाहणी केली. तालुक्यात आतापर्यंत 67 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता 50 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.





